। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पोयनाड पोलीस ठाणे येथील आर.डी.सी.सी बँक मधील एटीएम मधुन पैसे चोरीच्या गुन्हयाची उकल करुन पाच जणांना पोयनाड पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले आहे.

सोनु कुमार सरजुप्रसाद गौतम वय-24 मुळ रा.उमरच पो. जेठवाडा ता. लालगंज जि.प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. फादरवाडी, बसई फाटा जि.पालघर यास गुन्हयातील फिर्यादी आर.डी.सी.सी. बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बाळाराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले होते. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी सोनुकुमार सरजुप्रसाद गौतम याची चौकशी केली असता करता त्याने त्याचा वसई येथील साथीदार रणजितकुमार गोविंद प्रसाद वय-19 राज्य. उ. प्रदेश सध्या रा पालघर असल्याचे कबुल केले.
त्यानंतर पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शुक्ला यांचे नेतृत्वाखाली पोयनाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी टीम तयार करुन रणजितकुमार गोविंद प्रसाद याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने वडखळ, पेण येथील जमील छेदी शेख वय 18 रा. मौआईमा, नई बस्ती, जि.ईलाहाबाद राज्य. उ. प्रदेश सध्या रा.वडगाव ता. पेण, जितेंद्र विनोद सिंग वय 23 रा. गायघाट रोड, दहीलामडु, प्रतापगढ राज्य. उ. प्रदेश सध्या रा. चिंचपाडा ता.पेण, विशाल राजेंद्र यादव वय 28 रा. वडखळ ता. पेण हे आणखी तीन साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना देखील वडखळ तसेच पेण येथून ताब्यात घेवून अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक फौजदार दुष्यंत जाधव हे करीत आहेत.
हे आरोपी चोरी करताना एकजण एटीएममध्ये पैसे चोरी करण्याकरीता प्रवेश करतो. तर इतर चौघे बाहेर टेहेळणी करत थांबत असत. आत ए. टी. एम. मध्ये प्रवेश करणारा आरोपी स्क्रूड्रायव्हरने सदर ए.टी.एम. मशीनचे पैसे बाहेर येण्याचे शटर उचकटून-उपकुन आपल्याकडील मशीन सदर शटर मध्ये मशीनमध्ये घुसवीत असत. त्याच्या सहायाने बाहेर आलेली रक्कम शटरमध्ये घुसवलेल्या मशीनच्या सहायाने बाहेर खेचुन सदर पैसे लंपास करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील सर्व आरोपीत हे आळीपाळीने अशा चोर्या करत असल्याचे तसेच वयस्कर गोरगरीब ज्यांना ए.टी.एम वापरण्याचे माहीत नाही अशा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून सदर आरोपीत हे पैसे काढून देतो असे त्यांना विश्वासात घेवून त्यांच्या कडील एटीएम चा पासवर्ड माहीती करुन घेवून चलाखीने त्यांचा ए.टी.एम. बदलुन त्यांच्या कार्ड मधून पैशाची चोरी करीत असल्याचेही सखोल तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपींकडून स्क्रुड्रायव्हर, पैसे काढण्यासाठी बनवलेली लोखंडी पत्र्याची मशीन तसेच वेगवेगळ्या बँकेचे एकूण 32 ए.टी.एम. डेबीट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणात सहा पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक एम. टी. जाधव, सहायक फौजदार दुष्यंत जाधव, सहा. फौजदार रामचंद्र ठाकूर, पोलिस नाईक अक्षय पाटील, पोलिस शिपाई किशोर चव्हाण यांचा सहभाग होता.