रायगडमधील खोपोली पोलिसांची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मंदिरे लुटणार्या टोळीला रायगडच्या खोपोली पोलिसांनी गजाआड केले. शिलफाटा-खोपोली येथील हनुमान मंदिर व बहिरी देव मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यास त्यांना यश आले. ही टोळी आंतरराज्यीय असून त्यांच्याकडून मंदिर चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
खालापूर तालुक्यातील खोपोली परिसरातील बहिरी देव आणि हनुमान मंदिर ही दोन मंदिरे चोरट्यांनी आठवड्यांनी फोडली. मंदिरामधील दानपेटीतील असलेली रोकड लंपास करून ते गायब झाले होते. एकूण अठरा हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली होती. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खोपोलीचे वरिष्ट पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते, पी.व्ही. पाटील, पी.टी. कुंभार, व्ही.व्ही. जाधव, पोलीस नाईक, पी.एल. भालेराव, एल.जी. शेडगे, एस.पी. बांगर, पोलीस शिपाई आर. एस. मासाळ, पी. एम. कळमकर, पी. एस. खरात, के. डी. देवकाते या पथकाने शोध सुरु केला.
सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू झाला. सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या अज्ञांताची यांची माहिती घेण्यात आली. त्यांच्या वर्णनाची संशयीत मंडळी पनवेलमध्ये असल्याचे समजले. त्याठिकाणी पथक रवाना झाला. मात्र, ते गोवा येथे गेल्याची माहिती मिळाल्यावर पथक गोव्याला रवाना झाले. मात्र त्या चोरट्यांनी म्हापसा येथील मंदिर लुटून ते सावंतवाडीकडे गेल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला. अखेर चौघांना सावंतवाडीला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडे असलेली सात लाख दोन हजार 800 रुपयांची रोकड जप्त केली. राजू शेख, इम्रान शेख व राकीब शेख व मुजाहिद खान या चौघांना अटक करण्यात आली.
महड येथील मंदिर चोरीचा डाव फसला मंदिर चोरणारी आंतराज्य, आंतरराष्ट्रीय टोळी असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये महड येथील गणेश मंदिराचे फोटो दिसून आले. त्यामुळे महड येथील गणेश मंदिरात चोरी करण्याचा त्यांचा डाव फसल्याचे पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
रेकी ठेवून करीत होते चोरी राजू शेख, इम्रान शेख व राकीब शेख व मुजाहिद खान हे चौघेही नोकरी, व्यवसायानिमित्त बेलापूर येथे मुजाहिद खानसोबत गेल्या पाच वर्षापासून राहत आहेत. बिगारीची कामे करून हे चौघेजण दिवस घालवित होते. मंदिरात चोरी करण्यापुर्वी एक दिवस अगोदर त्या परिसरातील पाहणी करणे, तेथील छायाचित्र काढणे अशा पध्दतीने चोरी करण्यापुर्वी ते रेकी करीत होते. या चौघांनी यापुर्वी गोवा म्हापसा, जूना पूणे हायवे पुणे-शिरूर आणि टिटवाळा येथील मंदिरे फोडून चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे.