वैश्य समाज माहेरवासिनींचा मेळावा उत्साहात

| चौक | वार्ताहर |

महिला म्हटले की त्यांना आवडणारा कार्यक्रम हळदी कुंकू, संगीत खुर्ची किंवा आता नव्यानेच प्रसिद्धीस आलेल्या पैठणीचा कार्यक्रम होय. दिवसभराच्या कामातून वेळात वेळ काढून पनवेल येथील वैश्य समाजाच्यावतीने माहेरवाशीन झालेल्या व नव्याने सासरी आलेल्या महिलांनी रविवार, दि. 16 रोजी मेळावा आयोजित केला होता. त्यात प्रामुख्याने विविध कलागुणांचे खेळ, संगीत, वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात रंग भरण्यासाठी स्नेहल मनोरे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. स्पर्धेचे नियोजन प्राची दबके यांनी केले. माहेरी आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या चेहर्‍यावर आईकडे आल्याने जो आनंद मिळतो, तो पहावयास मिळत होता. अनेक कलागुणांची उधळण माहेरवासिनींनी केल्यानंतर परत घरी जातेवेळी जशी आई आपल्याबरोबर काही खाऊचा डबा बांधून देते, त्याप्रकारे प्रत्येक माहेरवासिनीला मिठाईचा बॉक्स देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राची शेटे, वैशाली बडे, भारती अंग्रे, स्नेहा तांबोळी, मेघा मलबारी, शुभांगी शेटे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version