| चिपळूण । वृत्तसंस्था |
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातल्या मगरींच्या मुक्त वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण चिपळूण शहरातल्या चिंचनाका परिसरात रविवारी रात्री महाकाय मगर नागरी वस्तीत दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने मगरीला नदीपात्रात सोडावं तसंच त्या बाहेर येऊ नये यासाठी कार्यवाही करावी ही मागणी होते आहे.
चिपळूण शहरातून वाहणार्या शिव नदीत मगरींचा प्रचंड वावर आहे. चिपळूणमधल्या चिंचनाका भागात मगर रस्त्यावर आढळून आली त्यामुळे खळबळ उडाली. शिव नदीच्या पात्रात मगरींचा प्रचंड वावर, पावसाळ्यात या मगरी शहरात मानवी वस्तींमध्ये वावरताना दिसून येतात. रविवारी रात्री अशीच एक भली मोठी मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहून रस्त्यावरून जाणार्या वाहन चालकांचीदेखील चांगलीच बोबडी वळली. प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा रस्त्यावरील व्हिडीओ फोनमध्ये चित्रित केला. त्यानंतर मगरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. मानवी वस्तीमध्ये मगरींचा मुक्त वावर हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे.