प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट
| चिरनेर | प्रतिनिधी |
समुद्राच्या लाटांवर स्वार होत जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर उरणच्या एका 14 वर्षीय लेकीने थेट युवा ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. उरणमधील केगाव-दांडा येथील प्रियांशी मयूर पाटील ही दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमधील डकार येथे दि. 8 ते 12 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विंडसर्फिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटविणाऱ्या प्रियांशीच्या या यशामुळे रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी सोमवारी (दि. 2) प्रियांशीने आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी घरत यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले आणि युवा ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या. प्रियांशीच्या जिद्दीचे कौतुक करताना ती समुद्राच्या लाटांसोबत सहज खेळते. ती रायगडवासियांचा अभिमान असून, भारतासाठी पदक जिंकून आणेल, असा विश्वास महेंद्र घरत यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रियांशीने आपल्या यशामागे आई-वडिलांसह महेंद्र घरत यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक असताना महेंद्र घरत यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांनी मला कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाही. त्यांचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
प्रियांशीने 2025 मधील सिंगापूर इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. ती 2025 आणि 2026 मधील दुहेरी आशियाई पदकविजेती असून, गेल्या वर्षभरात तिने 15 राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली. जुलै 2026 मधील युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतल्यानंतर 4 ते 8 ऑगस्टदरम्यान मलेशियात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले. ती राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती असून, 2026 च्या विंडसर्फिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही तिने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.
परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी
प्रियांशी सध्या उरण-बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रशिक्षकाविना तिने स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर हे यश संपादन केले आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या प्रशिक्षणाचा आणि देश-विदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा खर्च पालकांना पेलणे कठीण जाते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करून तिच्या स्वप्नांना बळ दिले आहे. आता युवा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेल्या या उरणच्या लेकीकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.
