विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन

। गडब । वार्ताहर ।

संस्कार शिक्षण संस्था संचलित संस्कार विद्यालय गडब शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून प्रत्यक्ष महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा वेशभूषा व नृत्यातून साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा सादर केली.

सोहळ्याची सुरुवात श्रीगणेश वंदनेने झाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे जीवनचित्र रथाने सर्व उपस्थितांचे मन आकर्षित केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय नेते व समाजसुधारक महिला यांची वेशभूषा सादर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याचे प्रत्यक्ष दर्शन दिंडी सोहळ्यात दाखविण्यात आले. श्री ज्ञानेश्‍वर माऊलींनी चालविलेल्या भिंतीचे चलचित्र प्रदर्शित केले. जगाचा पोशिंदा राजा शेतकरी याचे जीवनचरित्र नृत्यातून सादर करण्यात आले. आदिवासी व कोळी समाजाची झलक नृत्यातून दाखविली. लावणी नृत्यात मुलींनी सादर केलेल्या लावणीला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सण व उत्सत यामध्ये गुढीपाडवा दहीहंडी, नारळी पौर्णिमा व गणपती उत्सव साजरे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे राकेश मोकल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत त्यांना आर्थिक मदत केली.

या कार्यक्रमास राकेश मोकल, संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, सचिव संदीप म्हात्रे, सहसचिव दिनेश म्हात्रे, खजिनदार विश्‍वनाथ पाटील, सदस्या विजया पाटील, मंगेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक चिंतामणी मोकल, शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version