। अलिबाग । प्रतिनिधी ।
जपान शितोरीयू कराटे डो असोसिएशन व कराटे प्रशिक्षक राहूल तावडे आयोजित 24 वी शितोरीयू कराटे डो चॅम्पियनशिप राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अलिबागमधील होरीझोन येथील सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेत अलिबागमधील कायरा अक्षय घरत या मुलीने सुवर्ण कामगिरी करीत सुवर्ण व कांस्य पदक मिळविले. तिने आतापर्यंत आठ पदके मिळविली आहेत.
कायरा घरत ही मुलगी अलिबाग तालुक्यातील चौल, शितलादेवी येथील रहिवासी असून सध्या अलिबागमध्ये राहत आहे. चेंढरे येथील सेंटमेरी स्कूलमध्ये इयत्ता दुसरीला शिक्षण घेत आहे. नुकतीच अलिबागमधील होरीझोन येथील सभागृहात कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत रायगडसह पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर, जिल्ह्यातून 400 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये कायरा घरत हीने काता आणि कुमिते या क्रिडा प्रकारात उत्तम कामगिरी करीत सुवर्ण व कांस्य पदक मिळविले. कायरा गेल्या अनेक वर्षापासून कराटेचे धडे घेत आहे. तिची आई पीएनपी शाळेत शिक्षिका असून पालकांकडून मिळालेले प्रोत्साहन व प्रशिक्षक राहूल तावडे यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कायराने अलिबागचे नाव कराटेमार्फत वेगळया उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतूक करण्यात येत आहे.