। पुणे । प्रतिनिधी ।
कर्जबाजारी झाल्याने देणेकर्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी सराफानेच चुलतभावाच्या मदतीने पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली होती. चौकशीत सराफी पेढीच्या मालकाच्या चुलतभावाला अटक केली आहे. राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (40), श्याम शिंदे (37) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून दोघेही भोसरी येथील रहिवासी आहेत.
धायरीतील काळूबाई चौक परिसरातील श्री ज्वेलर्स सराफी पेढीवर मंगळवारी भरदिवसा दरोडा पडला होता. पेढीचा मालक आणि कर्मचार्याला खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून 22 तोळ्यांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले होते. झटापटीत चोरट्यांकडील पिस्तूल सराफी पेढीत पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल ताब्यात घेतले. तेव्हा ते पिस्तूल खेळण्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजनुसार माग काढून दोघांना भोसरीतून ताब्यात घेत अटक केली होती. याबाबत केलेल्या चौकशीत ज्वेलर्स मालकानेच चुलतभावाला पेढीवर दरोडा टाकण्यास सांगितल्याचे समोर आले. पेढीच्या मालकावर 20 ते 25 लाख रुपयांचे कर्ज होते. देणेकर्यांकडून सहानुभूती मिळावी आणि काही काळाची उसंत मिळावी या उद्देशाने त्याने स्वतःच्या दुकानावर बनावट दरोडा घडवून आणला.