शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पेझारी परिसरातील खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे, यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पेझारी येथील श्रीभैरवनाथ युवक मंडळाच्या मैदानात व्यासपीठ तसेच भव्यदिव्य अशी व्यायामशाळा उभी केली जाणार आहे. या कामाचा भूमीपूजन सोहळा गुरुवारी (दि.2) मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी ॲड. निता पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, मंडळाचे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अद्ययावत अशी व्यायामशाळा पेझारीमध्ये उभी राहणार आहे. याठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांसाठी सर्व सोयीयुक्त असे स्टेजदेखील बांधले जाणार आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा भूमीपूजन सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. पेझारीमध्ये अद्ययावत अशा व्यायामशाळा आणि स्टेजमुळे खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ खुले होणार आहे. स्टेजच्या माध्यमातून अनेक वक्ते तयार होण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
