‘बॉयलर इंडिया २०२२’ चा शानदार समारोप

प्रदर्शनाला तब्बल 36 हजार अभ्यांगताच्या भेटी
देश विदेशातील 2500 मान्यवरांची उपस्थिती

| वावोशी | वार्ताहर |

राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित तीन दिवसीय ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शन, चर्चासत्राचा समारोप काल रात्री करण्यात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल ऑगस सपतोनो, इकॉनॉमिक कौन्सिल तोला उबेदि, प्यांगि सपुत्रा, कॉमर्स चेम्बर ऑफ ढाक्का बांग्लादेशचे मोहम्मद अब्दुल मनान, इंडस्ट्रियल बॉयलर इंडियाचे संचालक रोहिंटन इंजिनियर, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी सहभागी कंपन्यांना विविध सहा विभागात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पहिल्या विभागात प्रथम पुरस्कार अडाणी इलेक्ट्रिसिटीला, तर द्वितीय पुरस्कार अडाणी पॉवर तसेच तृतीय पुरस्कार टाटा पॉवरला प्रदान करण्यात आला. दुसर्‍या विभागात प्रथम पुरस्कार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, दुसरा पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर तृतीय पुरस्कार बिर्ला कार्बन इंडियाला प्रदान करण्यात आला. या प्रदर्शनात दररोज सुमारे 12 हजार लोकांनी भेट दिली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला तब्बल 36 हजार जणांनी भेट दिली. तर देश विदेशातील 2500 मान्यवर विविध विषयांवरील चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात एकूण 55 वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर विविध विषयांवर 30 माहितीपर व्याख्याने पार पडली.

मालदीव, बांग्लादेश यासह विविध 6 देशांच्या भारतातील वाणिज्य महादूतांनी प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी मालदीव, बांगलादेश, आफ्रिका, फिनलँड, स्वीडन या देशाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. तसेच देशभरातील बाष्पक निर्माते, बाष्पक वापरकर्ते, सल्लागार, विविध कारखान्याचे प्रतिनिधी, इंजिनिअर्स, शासकीय अधिकार्‍यांनी प्रदर्शन व चर्चासत्राला भेट दिली.

Exit mobile version