हॅकरची कमाल; पोलीस अधिकार्‍याची बनावट फेसबुक खाते उघडून फसवणूक

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

समाज माध्यमाचा वापर करणार्‍यांचे अकाऊंट हॅक करून त्याद्वारे बनावट अकाऊंट बनवून फसवणूक केली जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, चक्क एका पोलीस अधिकार्‍याचेच बनावट खाते बनवण्याचा पराक्रम एका हॅकरने केला आहे. दरम्यान, आपल्या नावाने तयार करण्यात आलेल्या या अकाऊंटवरून मैत्री स्वीकारण्यासाठी विनंती आल्यास ती स्वीकारू नये, असे समाज माध्यमावरूनच सांगण्याची वेळ त्या अधिकार्‍यावर आली आहे.

समाज माध्यमावर नेहमीच सक्रिय असलेले हे अधिकारी फेसबुक या समाज माध्यमावर सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सोशल साईडचा वापर देखील करत असून, त्याद्वारे त्यांनी आपले पोलिसी पोशाख परिधान केलेली छायाचित्रेदेखील प्रसिद्ध केली आहेत. याचाच फायदा एका अज्ञात हॅकरने उचलला असून, अधिकार्‍याने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचा वापर करून अधिकार्‍याच्याच नावाचं दुसरं बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. या बनावट अकाऊंटचा वापर अधिकार्‍यांच्या खर्‍या अकाऊंटवरील मित्रांना मैत्रीकरिता विनंती पाठवण्यासाठी करण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकार्‍याने दुसरे अकाऊंट बनावट असल्याचे जाहीर करून कोणीही त्यावरून मैत्रीसाठी आलेली विनंती स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version