महामार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

शिहू-नागोठणे-पोयनाड या महामार्गाचे डांबरीकरण झाले आहे. यामुळे प्रवासी व वाहनचालक सुखावले आहेत. मात्र, या आनंदावर विरजण पडत आहे. कारण प्रत्येक दिवशी या मार्गावर मोकाट गुरांचा सातत्याने उपद्रव वाढल्यामुळे प्रवासी तथा वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच, अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

शिहू-नागोठणे-पोयनाड हा मार्ग प्रवासी व माल वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ सतत सुरू असते. मात्र, मोकाट गुरांचा सातत्याचा होणारा रास्ता रोको वाहनचालक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. तर, रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने गुरांना धडकून अनेकदा अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच, या मार्गावर गुरांच्या झुंज लागत असल्याने प्रवाशांना याचा अधिक धोका जाणवू लागला आहे.

या मार्गावर ठिकठिकाणी मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. यामुळे येथून मार्ग काढणे अवघड होते. शिवाय रात्रीच्यावेळी अंधारात गुरे न दिसल्याने अपघात होतात. दुचाकीस्वारांना अधिक धोका आहे. तसेच, अपघातात अनेक गुरे जखमी होतात किंवा दगावतात. त्यामुळे पशुपालन व शेतकर्‍यांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत.

– दत्ता तरे, ग्रामस्थ झोतिरपाडा

Exit mobile version