मुलींच्या वसतिगृहामधील वॉशरुममध्ये आढळला छुपा कॅमेरा

| मुंबई | प्रतिनिधी |

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या संपूर्ण देशात ऐरणीवर आला आहे. कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. राज्यातही बदलापूर तसेच वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आंध्र प्रदेशात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण आंध्रात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात एका इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमधे गुप्त कॅमेरा लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये हा कॅमेरा लावण्यात आला होता. या प्रकरणात विद्यार्थींनींनी आक्षेप घेतल्यानंतर मुलांच्या हॉस्टेलमधील एक विद्यार्थी विजयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हॉस्टेलमधील एका मुलीने गुप्त कॅमेऱ्याची सूचना सर्वप्रथम कॉलेज प्रशासनाला दिली. ती मुलगी वॉशरुममध्ये गेली त्यावेळी तिला काहीतरी विचित्र वाटले. त्यावेळी तिला तिथे व्हिडिओ कॅप्चर करणारा कॅमेरा दिसला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मुलींची सुरक्षा आणि गोपनियतेबाबत काळजी वाढली आहे. विद्यार्थीनींच्या खासगी सुरक्षेचे उल्लंघन झाले असून या व्हिडिओचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version