विश्वचषकातील ऐतिहासिक ‌‘एकहाती’ विजय

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध अविश्वसनीय खेळी करून द्विशतक ठोकले. संघ संकटात असताना त्याने केवळ नामुष्की टाळली नाही, तर अविस्मरणीय विजयही मिळवला. आता विश्वचषकाच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले आहे. विश्वचषकामधील अशा काही इतर संस्मरणीय खेळींवर यानिमित्ताने क्रीडा जगताची नजर गेली आहे. ज्या खेळ्यांनी क्रिकेट विश्वामध्ये आपले स्थान आजही अबाधित ठेवले आहे. या अविस्मरणीय खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल , रिकी पाँटिंग, भारत कपिल देव , वेस्टइंडीज ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल या दिग्गजांचा समावेश आहे.

ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, वानखेडे स्टेडियम, 7 नोव्हेंबर 2023)
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 291 धावा केल्या. यात इब्राहिम झादरानने नाबाद 129 धावांची खेळी केली. यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून ऑस्ट्रेलियाची स्थिती एक वेळ 7 बाद 91 अशी केली होती. ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर होता. आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. केवळ ग्लेन मॅक्सवेल मैदानात होता. त्यालाही दोन वेळा जीवदान मिळाले. त्यामुळे तोही लवकरच माघारी परतणार, असे वाटत होते. मात्र, मॅक्सवेलने पॅट कमिन्सच्या साथीने आठव्या विकेटसाठी 170 चेंडूंत 202 धावांची अभेद्य भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. ज्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करणे ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना जमले नाही, त्या गोलंदाजांना मॅक्सवेलने अक्षरश: तुडवले. त्याची बॅट जणू काही दांडपट्टा झाला होती. यातही विशेष म्हणजे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तो दोन-तीन वेळा मैदानात कोसळला. त्याला धाव काढणेही अशक्य होत होते. मैदानात तात्पुरते उपचार करून तो केवळ एका पायावर उभा राहिला. केवळ उभाच राहिला नाही, तर त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने 128 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह 201 धावांची खेळी केली. यात कमिन्सचा वाटा 68 चेंडूंत नाबाद 12 धावांचा होता. मात्र, ज्या परिस्थितीत आणि ज्या जिद्दीने मॅक्सवेलने विजय मिळवून दिला, त्याची नोंद विश्वचषकाच्या इतिहासात झाली.

कपिल देव (भारत वि. झिम्बाब्वे, टनब्रिज वेल्स, 18 जून 1983)
या विश्वचषकामध्ये भारतीय संघ तसा लिंबू-टिंबू समजला जात होता. जागतिक पातळीवर दखल घ्यावी, असे भारतीय क्रिकेट संघाबद्दल कोणालाच वाटत नव्हते. यात भारताची लढत झिम्बाब्वेविरुद्ध होती. सुनील गावसकर (0), के. श्रीकांत (0), मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1), यशपाल शर्मा (9) एकापाठोपाठ माघारी परतल्याने भारताची अवस्था 5 बाद 17 अशी झाली होती. यानंतर कपिलदेवने एका बाजूने किल्ला लढविला. दुसऱ्या बाजूने रॉजर बिन्नी (22), रवी शास्त्री (1), मदन लाल (17) यांनी त्याला साथ दिली. भारताची स्थिती 8 बाद 140 अशी झाली. दीडशेच्या आत भारताचा डाव गुंडाळला जाणार, असे वाटत होते. मात्र, कपिलदेवने अविस्मरणीय खेळी केली. त्याने 138 चेंडूंत 16 चौकार व सहा षटकारांसह नाबाद 175 धावा केल्या. त्याला सय्यद किरमाणीने दुसऱ्या बाजूने साथ दिली. या जोडीने नवव्या विकेटसाठी 126 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताला 60 षटकांत 8 बाद 266 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. पुढे लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 57 षटकांत 235 धावांत आटोपला. पुढे भारताने विश्वचषकही उंचावला. त्यामुळे कपिलदेव यांची खेळी ऐतिहासिक ठरली.

मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज, 21 मार्च 2015, वेलिंग्टन)
न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आक्रमक सलामीवीर म्हणून ओळखला जात होता. विश्वचषकामधील सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा उल्लेख निघतो, तेव्हा गप्टिलचे नाव आजही घेतले जाते. हा विक्रम अद्याप अबाधित आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांविरुद्ध चौफेर फटकेबाजी केली होती. गप्टिलने 163 चेंडूंत 24 चौकार व अकरा षटकारांसह नाबाद 237 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या इतर एकाही फलंदाजाला अर्धशतकही ठोकता आले नव्हते. गप्टिलने पहिल्या 100 धावा 111 चेंडूंत पूर्ण केल्या होत्या. यानंतरच्या शंभर धावा त्याने अवघ्या 41 चेंडूंत पूर्ण केल्या. यामुळे न्यूझीलंडने 6 बाद 393 धावा केल्या. या धावांच्या डोंगरासमोर विंडीज दबावात आला. विंडीजचा डाव 30.3 षटकांत 250 धावांत आटोपला.

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज वि. झिम्बाब्वे, कॅनबेरा, 24 फेब्रुवारी 2015)
ख्रिस गेलचा दिवस असेल, तर त्याला कोणीही रोखू शकत नाही, याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. 2015च्या वर्ल्ड कपमध्येही गेलचा झंझावात बघायला मिळाला होता. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना फोडून काढले होते. कॅनबेरा येथे गेल वादळात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला होता. गेलने 147 चेंडूंत 16 षटकार व 10 चौकारांसह 215 धावांची खेळी केली होती. विंडीजने 2 बाद 372 धावा केल्या होत्या. पहिले शतक झाल्यानंतर द्विशतकाचा टप्पा गेलने अवघ्या 33 चेंडूंत पार केला होता. पुढे विंडीजने झिम्बाब्वेला 289 धावांत रोखून ही लढत डकवर्थ लुईस नियमानुसार 73 धावांनी जिंकली.

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया वि. भारत, 2003 )
भारतीय संघाने 2003च्या विश्वचषकामध्ये चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियासमोर भारताची डाळ काही शिजली नाही. यात कर्णधार पाँटिंगने विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 121 चेंडूंत आठ षटकार व चार चौकारांसह नाबाद 140 धावा केल्या. त्याने डॅमियन मार्टिनसह 234 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. ही जोडी फोडण्यासाठी गांगुलीने झहीर खान, जवागल श्रीनाथ, आशिष नेहरा, हरभजनसिंग, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, दिनेश मोंगिया, युवराजसिंग असे आठ गोलंदाज वापरले होते. मात्र, ते सर्व जण निष्प्रभ ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 2 बाद 359 धावा केल्या. या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही. भारताचा डाव 39.2 षटकांत 234 धावांत आटोपला होता. भारताने ही लढत 125 धावांनी गमावली. त्यावेळी भारतीय चाहते हळहळले होते. 1983 नंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी यामुळे भारताने गमावली.

Exit mobile version