। पनवेल । वार्ताहर ।
तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का पार्लर चालवण्यास कायद्याने बंदी असूनही खारघर येथील दि स्मोक कॅफेमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे उघडकीस आले. खारघर पोलिसांनी या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा मारून मॅनेजरसह दोघांना अटक केली आहे. तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर जप्त केले आहेत.
खारघर सेक्टर-3, बेलपाडा येथील दि स्मोक कॅफेमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती खारघर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरज जाधव व त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. कॅफेचा मॅनेजर जियाद नासिर बहादुरकर आणि वेटर फहिम निजाम अहमद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.
खारघरमधील हुक्का पार्लरवर छापा; मॅनेजरसह दोघांना अटक
