। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी (दि. 17) रात्री एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक मधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत चालू असून, शनिवारी रात्री मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रक चालक सुहास सुखदेव गोफणे (33) रा.पार्क साईड, विक्रोळी मुंबई हा पुण्याहून मुंबईकडे ट्रक घेऊन जात असताना तो बोरघाटात बोरघाट पोलीस चौकीजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तर चालकाच्या ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने त्याने तात्काळ बाहेर उडी मारल्याने तो वाचवला तर क्लीनर हा ट्रकच्या केबिन मध्ये अडकून गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या क्लीनरला बाहेर काढले असून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतूकसाठी चालू करण्यात आली होती.





