| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथे लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात होण्याची घटना सोमवारी सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक लागलेल्या आगीत हे जुने घर भक्ष्यस्थानी सापडले.
येथे रायबा भागोजी औकीरकर यांच्या जुन्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. यामुळे रायबा औकीरकर यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, जनावरांचे खाद्य आदीचे मोठे नुकसान झाले. उपसरपंच गणेश औकीरकर यांनी महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाला याची कल्पना दिली. तलाठी महाडिक यांनी याबाबत पंचनामा केला असल्याची माहिती औकीरकर यांनी दिली. रायबा औकीरकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी रायगड वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.