आफ्रिकेचा मानहानीकारक पराभव टळला

नेपाळचा अवघ्या एका धावेने पराभव

| किंग्सटाउन | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकाच्या गृपमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत आपला मानहानीकारक पराभव टाळला. शेवटच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी 2 धावांची गरज असताना क्लासेनने गुलशन झाला धावबाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात फिरकीपटू तबरेज शम्सीचा सिंहाचा वाटा होता. त्याने 4 षटकात 19 धावा देत 4 बळी घेतले. नेपाळकडून आसिफ शेखने झुंजार खेळी करत 42 धावा केल्या. अनिल साहने 27 धावा केल्या.

‘ड’ग्रुपच्या नेपाळ विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने दमदार गोलंदाजी करत तगडी फलंदाजी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 115 धावात रोखले. दक्षिण आफ्रिकेने रिझा हेंड्रिक्सच्या 43 धावांच्या जोरावर पहिल्या 10 षटकात चांगली सुरूवात केली होती. त्यांनी 11.2 षटकात 2 बाद 68 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर नेपाळने टिच्चून मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या. दिपेंद्र सिंहने 3 तर कुशल भुरटेलने 4 षटकात 4 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सने 18 चेंडूत नाबाद 27 धावा केल्याने आफ्रिकेला 20 षटकात 7 बाद 115 धावांपर्यंत मजल मारता आली.

दक्षिण आफ्रिकेचे 115 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या नेपाळने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली. मात्र, आठव्या षटकात तबरेज शम्सीने कुशाल भुरटेल आणि रोहित पौडेलला बाद करत नेपाळला दोन धक्के दिले. त्यानंतर सलामीवीर आसिफ शेख आणि अनिल साहने तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, मार्करमने अनिल साहला 27 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. सामना नेपाळच्या हातात होता असे वाटत होते. नेपाळ दक्षिण आफ्रिकेला मात देत यंदाच्या टी-20 विश्वचषकातील अजून एक मोठा उलटफेर करणार इतक्यात तबरेज शम्सी आफ्रिकेच्या मदतीला धावून आला. त्याने एकाच षटकात दिपेंद्रसिंह ऐरीला आणि आसिफ शेखला बाद केले. पाठोपाठ नॉर्खियाने कुशल मालाला 1 धावेवर बाद केले. शेवटच्या षटकात गुलशन झाने चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. मात्र, पाचव्या चेंडूवर गुलशनला एकही धाव करता आली नाही. शेवटच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी 2 धावांची गरज असताना गुलशन झा चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.

Exit mobile version