अरविंद गायकर यांचा इशारा
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड आगारातील सर्व प्रवासी गाड्या या जीर्ण व नादुरुस्त असून, याचा असंख्य प्रवासीवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर 2022 पासून मागणी करूनसुद्धा विभाग नियंत्रक रामवाडी पेण येथून मुरुड आगाराला नवी गाड्यांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जुन्या गाड्या वेळोवेळी बंद पडत आहेत. याकडे रायगडचे विभाग नियंत्रक दुर्लक्ष करीत असून, त्यांच्या निषेधार्थ समाजसेवक व पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर हे 20 मार्चपासून मुरुड तहसील कार्यलयासमोर उपोषणास बसणार आहेत.
याबाबतचे रीतसर निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभाग नियंत्रक रामवाडी पेण, मुरुड पोलीस ठाणे, मुरुड तहसीलदार व मुरुड आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली आहेत. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मागील आठ वर्षांपासून मुरुड आगाराला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाहीत. मुरुड आगारचा कारभार हा जुन्याच बसेस वर सुरु आहे. त्यामुळे गाड्या जुन्या झाल्याने मुरुड तालुक्यातील प्रवासीवर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याकडे अरविंद गायकर यांनी लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन मुरुड आगारातील कार्यशाळा उपअधीक्षक मंगेश पाटील यांना देण्यात आले.