आपचे पाली नगरपंचायतीला निवेदन
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली नगरपंचायत हद्दीतील साजन किराणा स्टोअर्स लगत व वरच्या मोहल्ल्यात जाणार्या गल्ली जवळील नाल्याला झाकण बसविण्यात आलेले नसल्याने या उघड्या नाल्यात कोणी पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या नाल्यात एक लहान मुलगा पडला होता. त्यामुळे येथे लागलीच झाकण बसवून मार्ग सुरक्षित करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षातर्फे पाली नगरपंचायतीला देण्यात आले आहे.
येथील रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन महिने झाले आहे. तसेच त्या बाजूला असलेल्या इतर नाल्यांची सुद्धा कामे झाली आहेत. परंतु हा नाला खूला असून त्यावर कोणत्याही प्रकारचे झाकण किंवा ग्रील टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे येथून येणार्या जाणार्या वृद्धांना, महिलांना व लहान मुलांना नाल्यात पडून दुखापत होण्याची शक्यता आहे. तसेच तेथील रहिवाशांना हकनाक हा त्रास सहन करावा लागत आहे. निवेदन देताना आम आदमी पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष अशोक सोनू रायकर, इरफान शेख, दीप्ती दळवी, यशोदा जगताप व फैसल महाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उघड्या नाल्यामुळे येथून ये जा करणे अवघड झाले आहे. एक लहान मुलगा काही दिवसांपूर्वी येथे पडला सुद्धा आहे. नगरपंचायतने लवकर हा नाला दुरुस्त करून यावर झाकण लावावे. – अशोक रायकर, अध्यक्ष आम आदमी पार्टी सुधागड