वाहतूक काही काळ ठप्प
। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर नडगाव गावाच्या हद्दीत दरड रस्त्यावर आल्याने गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरडीचे मोठे तुकडे रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड रस्त्यावर आल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, महामार्ग विभागाचे कर्मचारी तसेच एल अँड टी कंपनीचे कामगार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर आलेली दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासात दरडीचे तुकडे बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुरुवातीला खबरदारी म्हणून पोलिसांनी मोहोप्रे गावापासून दोन्ही बाजूने जाणारी वाहने एकाच मार्गाने सोडून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीमुळे मोठी दुर्घटना टळली. पावसाळ्यात महामार्गाच्या डोंगर उतारांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून, वाहनचालकांनी अशा ठिकाणी सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
