बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी
| राबगाव /पाली | प्रतिनिधी |
वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.6) भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजीत होता.
श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दाखल झाले होते. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी काही भाविक पायी आले, तर काही भाविकांनी पायी दिंडी आणली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट केली होती. मंदिरात व मंदिराबाहेर सुबक रांगोळ्या देखील काढल्या आहेत. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार, फुल, पापड व मिरगुंड विक्रेते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदिंचा धंदा चांगला झाला. भाविक वा पर्यटकांच्या वाहनामुळे पालीत काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नाक्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस तसेच पूर्णवेळ बल्लाळेश्वरा मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी योग्य व अद्ययावत सोयी सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. अत्यल्प दरात प्रसादाची सोय आहे. दोन मोफत पार्किंग आहेत. आणि दोन भक्त निवासी देखील आहेत. त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय होत नाही.
-जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आलेल्या भाविकांनी वेगवेगळ्या प्रकारची खरेदी देखील केली, त्यामुळे व्यवसाय चांगला झाला.
-राहुल मराठे,
दुकानदार







