शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधानपरिषदेचे आ. जयंतभाई पाटील म्हणजे जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा नेता. त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराकडून तसेच मोर्बा विभागातील जनतेकडून हार्दिक शुभेच्छा!
स्व. भाऊ प्रभाकर पाटील यांच्यासमवेत काही काळ शेकापचे काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनंतर आ. जयंतभाई पाटील यांनी खऱ्या अर्थाने शेकापची धुरा पुढे सांभाळली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आ. जयंत पाटील आज पक्षाचे काम पाहात आहेत. आ. जयंतभाईंनी सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करून समाजमनावर आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकापने रायगड जिल्ह्यात भरारी घेतली आहे. आजचे राजकारण पाहता, एक काळ निश्चितपणे शेकापचा आपल्याशिवाय राहणार नाही. सत्तेसाठी राज्यात व देशात आज काहीपण घडत आहे. पण, आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेकापचे काम करताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. आमचे नेते आ. जयंतभाई हे स्वाभिमानी आहेत. गोरगरीब, कष्टकरी, दीनदुबळ्या जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा हा आपला नेता आहे.
विधान परिषदेत लोकांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी व लोकप्रतिनिधी कसा परखड असावा हे दाखवून दिले आहे. आपल्या आक्रमक शैलीने समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून त्यांनी विधान परिषद अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना अनेक संस्था त्यांनी नावारूपास आणल्या आहेत. सहकार क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उत्तुंग भरारी घेतली आहे.
जयंतभाई म्हणजे आंदोलनकर्ते नेते असून, समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते नेहमीच झटत असतात. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनामध्ये ठेवून त्यांची कामे झाली पाहिजेत या मताचे आ. पाटील असून, त्यांनी शेकापच्या माध्यमातून आपला एक दबदबा रायगड जिल्ह्यात निर्माण केला आहे. आ. जयंतभाई पाटील यांनी तरुणांना चांगले मार्गदर्शन करून तरुणांनी आपला व्यवसाय सांभाळून राजकारणापेक्षा समाजकरणाला अधिक महत्त्व द्या, असे ते नेहमीच सांगत असतात. त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर व अल्लाह चरणी प्रार्थना!
– अस्लम इब्राहिम राऊत