दारुच्या दुकानांवर नजर

कंट्रोल रुम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात

। रायगड । खास प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार आता प्रशासकीय यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. या कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री करणार्‍या दुकांनावर प्रभावी नियंत्रण राहणार आहे. यासाठी संबंधित दुकानांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच कंट्रोल रुम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 18 गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये सुमारे 5 हजार लिटर दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 2 लाख 71 हजार 425 रुपये आहे. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकूण 60 प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले. यापैकी 13 कलम 93 अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आले आहेत. तसेच संशयित आरोपींना गुन्ह्यापासून परावृत्त करण्याकरीता एकूण 362 कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथके तैनात असून पथकांस आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही, तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही. याकरीता रायगड जिल्ह्यात शेडूंग, ता.खालापूर, खारपाडा, ता. पेण व चांदवे, ता-पोलादपूर येथे दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपर्‍यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकणार्‍या सीमावर्ती भागातील संवेदनशील ठिकाणे ओळखून त्याठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी तपासणी नाके असणार आहेत. या माध्यमातून सर्व हालचालीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अंमली पदार्थ, दारू, शस्त्रे आणि स्फोटकांसह प्रतिबंधित वस्तूंच्या हालचालींना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जिल्हा सीमेवरून होणारी दारू आणि रोकड वाहतुकीची निर्गमन आणि प्रवेशस्थाने ओळखून त्यावर सर्व संबंधित जिल्हा पथकाने योग्य ती कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकार्‍यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन न करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. रस्ते, सागरी आणि रेल्वे मार्गाने होणार्‍या वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पाडावी. याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटसअ‍ॅप क्र.8422001133 व टोल फ्री क्र.18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दुरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क रविकिरण कोले यांनी केले आहे.
Exit mobile version