विधिमंडळातील बुलंद आवाज..

शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेते स्व. नारायण नागू पाटील, रायगडच्या राजकारणात ठसा उमटविणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व स्व. प्रभाकर पाटील आणि विधिमंळातील बुलंद आवाजाने सभागृह दणाणून सोडणारे स्व. ॲड. दत्ता पाटील यांचा वैचारिक वारसा शेकापचे सरचिटणीस आ. जयंतभाई पाटील यांनी यशस्वीपणे पुढे नेला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर शेकापची ही मुलूखमैदानी तोफ राज्याच्या राजकारणात कायमच धडाडत राहिली आहे. राजकारणातच नव्हे, सहकार चळवळीसह शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज आ. जयंतभाई पाटील वयाच्या 69 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या या बुलंद आवाजाची धार राज्याच्या राजकारणात आणखीन तेज होवो, ही शुभेच्छा!

शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंतभाई पाटील यांना शेतकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा कै. नारायण नागू पाटील यांच्याकडून मिळाला. शेतकऱ्यांची चळवळ उभारुन आंदोलन करणारे श्रमजीवी जनतेचे झुंजार नेते म्हणून ना.ना. पाटील ओळखले जायचे. त्यांच्या घरात शेतकरी व कष्टकरी यांचे राजकारण चालत असे. त्यामुळे गरिबांची दु:ख, त्यांचे हाल त्यांनी लहानपणीच पाहिले होते. पुढे हाच वारसा त्यांचे सुपुत्र प्रभाकर नारायण पाटील यांनी यशस्वीपणे सांभाळला. प्रभाकर पाटील यांनी वडील ना.ना. पाटील यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व यांमुळे प्रभावित होऊन राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने व अभ्यासूवृत्तीने अनेक सभा गाजविल्या. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. पुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकून, त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली. सहकारी चळवळ रुजवली. तर, दुसरीकडे डाव्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व दीर्घकाळ कै. ॲड. दत्ता पाटील यांनी केले. निष्णात फौजदारी वकील अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठविला. आपल्या वकिलीच्या बळावर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत केले. स्थानिक भूमीपुत्र, मच्छिमारांचे प्रश्न ऐरणीवर आणत शेकापची रायगड जिल्ह्यात भक्कम तटबंदी उभारण्यात त्यांना त्याकाळी प्रभाकर पाटील, दि.बा. पाटील यांनी मोलाची साथ दिली.

दत्ता पाटील यांनी 27 वर्षे विधानसभेत अलिबाग-उरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. धारदार वक्तृत्व, हजरजबाबीपणा यांच्या जोरावर, संसदीय आयुधांचा अचूक वापर करीत त्यांनी विधानसभा गाजवली. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी रायगडसह कोकणात शाळा, कॉलेजचे नेटवर्क उभारुन, उच्च व्यावसायिक शिक्षणाच्या संधी निर्माण करुन दिल्या. आजोबा नारायण नागू पाटील, वडील प्रभाकर नारायण पाटील आणि काका ॲड. दत्ता पाटील यांचा हा वारसा शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील, मीनाक्षी पाटील आणि पंडितशेठ पाटील यांनी समर्थपणे पेलला. घरातील ज्येष्ठांकडून त्यांना राजकारण, समाजकारणाचे बाळकडू मिळाले. प्रभाकर पाटील यांची नाळ ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी घट्ट जोडलेली होती. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ते खूप जवळचे वाटत. आपल्या वडिलांना लोकांचे प्रश्न सोडविताना पाहातच आ. जयंत पाटील मोठे झाले. त्यामुळे हेच ग्रामीण कार्यकर्ते पुढे आ. जयंतभाई पाटील यांच्याशी जोडले गेले.

रायगड जिल्हा परिषदेतून ते थेट विधान परिषदेवर निवडून गेले. गेली 24 वर्षे ते विधान परिषदेत शेकापचे नेतृत्व यशस्वीपणे करीत आहेत. त्यांच्या संसदीय कौशल्याची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, ती उल्लेखनीय अशीच आहे. संख्याबळाच्या बाबतीत शेकाप इतर पक्षांच्या तुलनेत कमी असला तरी, राजकीय कौशल्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर बिनविरोध, तर कधी निवडणूक लढवून शेकाप नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात बसण्याचा मान मिळवला.
प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्वासह संसदीय आयुधांचा योग्य वापर करीत आ. जयंतभाई पाटील विधिमंडळ कामकाजात नेहमीच सक्रीय राहिले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांमुळे ते राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले. विधिमंडळात विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षांना त्यांची नेहमीच दखल घ्यावी लागली. विधिमंडळात शेकाप हा सुरुवातीपासूनच, बहुतांश काळ विरोधात होता. अपवाद ठरले ते 1978 साली आलेले पुलोद सरकार आणि 1999 साली आलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांचे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार. हे सत्तेत येण्याचे अल्पकालीन अपवाद वगळता महाराष्ट्र विधिमंडळात शेकाप विरोधी बाकावर बसला. असे असले तरी एका समर्थ, आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका शेकाप नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापने चोख बजावली आहे.

विधिमंडळात शेकापचा आवाज सुरुवातीपासूनच प्रभावी राहिला आहे. त्याला कारण शेकापचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आहेत. कृष्णराव धुळप, दि.बां. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, ॲड. दत्ता पाटील यांच्यासारख्या शेकाप नेत्यांनी विधिमंडळात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. तोच वारसा गेली 25 वर्षे शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील यांनी यशस्वीरित्या पुढे नेला आहे. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वाने त्यांनी सभागृहाला नेहमीच दखल घ्यायला भाग पाडले आहे. म्हणूनच संख्याबळ कमी असले तरी राज्याच्या राजकारणात शेकापचा नेहमीच दबदबा राहिला आहे. कोणत्याही राज्याच्या राजकारणात विरोधी दबावगट महत्त्वाचा असतो. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडून, त्या प्रश्नांची दखल घेऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे काम आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापने चोख बजावले आहे. किंबहुना, सक्षम विरोधकाची भूमिका शेकापने समर्थपणे पार पाडली आहे.

शेकापच्या संघटनात्मक पातळीवर विचार केला तर आ. जयंत पाटील यांनी पक्षाचे जिल्हा चिटणीस ते पक्षाचे सर्वोच्च सरचिटणीस पदावर केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. जिल्ह्यासह राज्यस्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांशी असणारा थेट संपर्क, तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटणारा आधार यामुळे पक्षसंघटनेत आ. जयंतभाईंविषयी जवळीक आणि विश्वास वाटतो, ही जमेची बाजू आहे. आमदार भाई जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

– ॲड. प्रसाद पाटील

Exit mobile version