ग्रामपंचायतीची तत्परता, मोठा अनर्थ टळला
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
बोर्लीपंचतन येथील होळी परिसरात अनधिकृतपणे पार्क केलेल्या एका लक्झरी बसला शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या परिसरात जवळपास तीन लक्झरी बस नियमितपणे उभ्या राहात असून, या बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भाड्याने चालविल्या जात असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, परिसरात जळत असलेल्या कचऱ्याच्या आगीतून ही आग बसपर्यंत पोहोचल्याने बसने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नक्की कारण काय, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून, या बस होळी परिसरातील गावकीच्या जागेत अनधिकृतपणे पार्क करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
होळी परिसरातील ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असून, आगीचे स्वरूप भीषण बनू नये व परिसरात आग पसरू नये यासाठी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे व ग्रामविकास अधिकारी शंकर मयेकर यांनी तातडीने हालचाल करत श्रीवर्धन येथून अग्निशमन बंब मागविला. वेळेत आग आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपीक रुपेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर लक्झरी बसचे मालक सुरेश दळवी असल्याचे समजते. दरम्यान, होळी परिसरात काही वाहने दीर्घकाळ पार्क केलेली असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जाणकार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
