सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावले
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील खारघर येथे एका स्कूल बसला (एमएच 06 एस 7603) भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि.12) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु सुदैवाने वाहकाच्या सतर्कतेमुळे त्याने गाडीतील तिन्ही विद्यार्थ्यांना प्रसंगावधान राखीत बसमधून खाली उतरवल्याने पुढील दुर्घटना टळली.
सिबीडी बेलापूर येथील पिपल्प एज्युकेशन सोसायटीची ही स्कूल बस आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर 15 घरकुल सोसायटी ते गुडवील इमारत येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस पुढे जात असताना अचानकपणे बसमधून धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने क्लिनरच्या मदतीने बस बाजूला घेऊन आतील विद्यार्थ्यांना प्रथम तातडीने बाहेर काढले व त्यांना सुरक्षित जागी उभे केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. काहींनी त्वरित अग्निशामक दलाला कळवले असता काही वेळातच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्तीचे प्रयत्न करुन त्वरीत आग विझवली. या आगीत काही काळासाठी आगीच्या धुराचा लोळ परिसरात पसरला होता. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसला आग लागल्याची माहिती मिळताच खारघर पोलिसांचे पथक, वाहतूक शाखेचे पथक व पालकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मुले सुखरूप असल्याचे पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. गेल्या काही महिन्यापासून पनवेल व नवी मुंबई परिसरात वारंवार होणार्या या आगीच्या घटनांमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सीबीडी येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेची ही बस आहे. बसमधील तीनही विद्यार्थी सुखरूप असून आगीवरही तातडीने नियंत्रण मिळवले आहे.
योगेश गावडे, वाहतूक अधिकारी, खारघर