महामंत्री विरुद्ध जिल्हाध्यक्ष संघर्ष उघड
| रायगड | विशेष प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील भाजपमध्ये मोठी उभी फूट पडल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. महामंत्री विरुद्ध जिल्हाध्यक्ष असा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे दिसू लागला असून, वडखळ-वाशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा या वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या मतदारसंघातील विद्यमान सदस्य हे खासदार धैर्यशील पाटील यांच्या गटाचे मानले जातात. मात्र, भाजपचे महामंत्री वैकुंठ पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या उपजिल्हा अध्यक्ष मिलिंद पाटील यांना वैकुंठ पाटील व सतीश धारप यांचा पाठिंबा मिळत असल्याने पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
रविवारी सायंकाळी मिलिंद पाटील यांनी वाशी विभागात शक्तीप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने एक बैठक घेतली. या बैठकीस वैकुंठ पाटील यांच्या मर्जीतील व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील, राजू मोकल यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे ऊर्फ हरी ओम यांच्यावर टीका-टिप्पणी करण्यात आल्याचे समजते.
महत्त्वाची बाब म्हणजे, हरी ओम यांचे तिकीट जवळपास निश्चित असताना मिलिंद पाटील यांनी घेतलेली ही बैठक महामंत्री वैकुंठ पाटील व सतीश धारप यांच्या सांगण्यावरून झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील पाटील यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना खच्ची करण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकंदरीत, वाशी येथे झालेल्या या बैठकीनंतर पेण भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतही आमदार रवीशेठ पाटील गटाकडून खासदार धैर्यशील पाटील यांना एकाकी पाडण्यात आल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच आता उपजिल्हा अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांना डावलून बैठक घेतल्याने पक्षांतर्गत नाराजी अधिक वाढली आहे. या सर्व घडामोडींमुळे पेण भाजपमध्ये केवळ एक-दोन नव्हे तर, तब्बल तीन गट निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले असून, याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






