पंतप्रधानपदाची पात्रता मराठी माणसाकडे हवी

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
मुंबई | प्रतिनिधी |
देशाच्या पंतप्रधानपदी महाराष्ट्राचाच व्यक्ती बसला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. एखादा मराठी माणूस खरोखरच त्या पात्रतेचा असेल, तर भविष्यात कदाचित तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल,असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं.
एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी आपली भूमिका मांडली. पंतप्रधान पदासाठी सक्षम नेता म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्याच पार्श्‍वभूमीवर त्यांना मराठी माणसाच्या पंतप्रधान पदाबाबत प्रश्‍न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी आपलं परखड मत मांडलं.
सत्ता गेली की लोक अस्वस्थ होतात –
राजकारणात मतभिन्नता असली पाहिजे. मतभेद असता कामा नये, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यांचे विचार आमचे आदर्श आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या विचारांनुसार चालण्याचा अधिकार आहे. जनतेच्या न्यायालयात कुठला पक्ष विकासाभिमुख आहे, कोणतं नेतृत्व योग्य आहे हे ठरविण्याचा अधिकार त्यांचा आहे. शेवटी जयपराजय होतच असतात.

कधी कधी अच्छे दिन कधी बुरे दिन येतात. मात्र, आजकाल विरोधी पक्षात जातात तेव्हा लोक अस्वस्थ होतात. आपण सत्तेत असू तेव्हा जबाबदारीने काम करू आणि विरोधात असू तर त्यापेक्षा चांगले काम करू, असे विचार ठेवले तर लोकशाहीत गुणात्मक बदल होतील.
नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री

Exit mobile version