हक्कासाठी धनगर समाज एकवटला

अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
| अलिबाग | प्रतिनिधी |
आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत जिल्ह्यातील धनगर समाज मंगळवारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी एकवटला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर समाज सहभागी झाला होता.

सकल धनगर समाजाने क्रीडा भवन येथून मोर्चाला सुरुवात केली. पारंपरिक पेहराव, खांद्यावर पिवळा मफलर, उंच आकाशाकडे झेंडा फडकवत आणि ढोलाच्या तालावर नाचत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. यळकोट यळकोट जय मल्हार, अशा घोषणा देत होते. त्यामुळे अलिबाग शहर नृत्याबरोबरच ढोलाच्या आवाजाने दुमदुमून गेले होते. राज्य सरकारने एसटी प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. जातीचे दाखले मिळावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.

या मोर्चात जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मधुकर ढेबे, कल्याणकारी धनगर समाज रोहा तळा मुरूडचे अध्यक्ष धाऊ ढेबे, धनगर समाज सेवा विकास मंडळ माणगावचे रमेश बावदाने, हरहर चांगभले धनगर समाज संघटनेचे संतोष आखाडे, रायगड जिल्हा युवा धनगर समाज संस्थेचे रामभाऊ केंडे, महाड तालुका धनगर समाज संघटनेचे विलास ढेबे, पेण तालुका धनगर समाज संघटनेचे राजू आखाडे, कल्याणकारी धनगर समाज मुंबईचे जनार्दन ढेबे ,पोलादपूर तालुका धनगर समाज संघटनाचे पदाधिकारी व सकल धनगर समाज आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा
मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र सरकारने अजूनही सकारात्मक भूमिका घेतली नाही.

मधुकर ढेबे – अध्यक्ष, जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था
Exit mobile version