। पनवेल । वार्ताहर ।
अनैतिक संबधामुळे मावस भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने उंदिर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात नवीन पनवेल भागात ही घटना घडली. उपचारादरम्यान विवाहितेने आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितले नव्हते. मात्र मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या रेकॉर्डींगवरुन तीने मावस भावाकडुन होत असलेल्या अत्याचाराला कंटाळुन आत्महत्या केल्याचे उघडकिस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या घटनेतील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पिडित महिला पती व दोन मुलांसह नवीन पनवेल येथे राहत होती. तिचा पती कंटेनर चालवित असल्यामुळे त्याला पनवेलच्या बाहेरचे भाडे भेटल्यानंतर तो दोन- तीन दिवस बाहेर राहत असे. या दरम्यान सारीकाचा मावस भाऊ तिच्या घरी नेहमी येत जात तसेच तिच्या घरी राहत. याचाच गैरफायदा घेत दोन वर्षापुर्वी त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने अनैतिक संबध ठेवले. त्यानंतर त्याने तिला मानसिक व शारीरीक त्रास देण्यास सुरुवात केली.
अखेर त्याच्या जाचाला कंटाळून पिडित महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती तिच्या पतीला समजल्यानंतर त्याने तिला पनवेलमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. काही दिवसानंतर कुटुंबियांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात विष घेण्यापूर्वी आरोपीसोबत केलेल्या संवादाची रेकॉर्डिंग आढळुन आली. त्यानूसार तिच्या पतीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढिल तपास सुरु आहे.