। मुंबई । प्रतिनिधी ।
घाटकोपरमधील नारायण नगरातील युनियन बँक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील शिंप्याच्या दुकानाला मंगळवारी (दि.20) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील तीन कामगार होरपळले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आग लागताच कामगारांनी दुकानातील माल वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीचा भडका उडाला. सुमारे एक हजार चौरस फूट जागेत आग लागली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. आगीमुळे दुकानातून धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे आग विझविण्यात अग्निशामकांना अडचणींचा सामना करावा लागला.
अग्निशमन दलाने आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आग भीषण स्वरूपाची वर्दी क्र.1 असल्याचे घोषित केले. दरम्यान, आगीत अडकलेल्या रियाझुद्दीन (30), वलयात अली (50), हद्दीस अली (30) या तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यापैकी दोघे 30 ते 60 टक्क्यांपर्यंत होरपळले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. रियाजुद्दीन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारादरम्यानच तिघांनीही डॉक्टरांच्या सल्याविना घरी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या आगीत दुकानातील कपडे, इस्त्री, विजेच्या तारा, विद्युत यंत्रणा, लाकडी सामान, शिलाई यंत्र, कागदपत्रे व अन्य सामान जळून खाक झाले. तसेच, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.







