| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमधील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आज (दि.6) पहाटे लागलेल्या आगीमुळे14 मजली व्यावसायिक इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या लोअर परळ भागातील कमला मिल्स कंपाऊंडमधील टाइम्स टॉवर इमारतीमध्ये आज (दि.6) सकाळी भीषण आग लागली. सकाळी सहाच्या सुमारास लागलेली ही आग कित्येक तास उलटूनही आटोक्यात आली नसल्याने अग्निशमन दलाला अडचणी निर्माण होत होत्या. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले, तरी आगीमुळे व्यावसायिक इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. पार्कसाइड सुरक्षा पथकाने अग्निशमन दलाच्या आगमनापूर्वी त्यांच्या इमारतीतील अग्निशामक उपकरणे वापरून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले, मात्र वायर आणि एसीमध्ये आग लागल्याने अजूनही धुराचे लोट दिसत आहेत. धूर ओसरल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले जाईल. सध्या आत कोणीही अडकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल.
टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग
