वाऱ्यामुळे आग पसरून कॉटेजचे मोठे नुकसान
। अलिबाग | प्रतिनिधी ।
नागाव येथील मांजरेकर कॉलोनीत रविवारी (दि.3) दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत एका कॉटेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉटेजच्या टेरेसवरील बांबू टेन्टला अचानक आग लागली. त्यानंतर प्रचंड उष्णता आणि वेगवान वाऱ्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. कॉटेज चालक आणि उपस्थित पर्यटकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेली. दरम्यान, टेरेसवरील आगीच्या ठिणग्या खाली पहिल्या मजल्यावरील टेन्ट हाऊसवर पडल्याने तेथेही आग भडकली. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच अलिबाग नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कॉटेजचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.






