पनवेलच्या टी-पॉइंट पुलावर डंपरला भीषण आग

सुदैवाने जीवितहानी टळली; काही काळ वाहतूक विस्कळीत

। खांदेश्वर । प्रतिनिधी ।

पनवेलच्या टी-पॉइंट पुलावर बुधवारी रात्रीच्या सुमारास क्रश सँडची वाहतूक करणाऱ्या डंपरला अचानक भीषण आग लागली. यात डंपर जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पनवेल आणि कळंबोली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.

पनवेलमधील अत्यंत वर्दळीच्या टी-पॉइंट पुलावर बुधवारी रात्रीच्या सुमारास क्रश सँडची वाहतूक करणाऱ्या अवजड डंपरला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दलाचे जवान तातडीने अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. डंपरमधून आगीचे मोठमोठे लोळ बाहेर पडत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. जवानांनी तातडीने होज पाइपच्या साहाय्याने पाण्याचा मारा सुरू करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, डंपरमधील डिझेल आणि टायरमुळे आगीची तीव्रता वाढत होती. त्यामुळे पनवेल अग्निशमन दलाने कळंबोली अग्निशमन केंद्राची अतिरिक्त मदत मागवली. त्यानंतर दोन्ही अग्निशमन केंद्रांतील जवानांनी एकत्रितपणे शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, टी-पॉइंट पुलावर भररात्री डंपरला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे पुलावरील वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला. आग पूर्णपणे विझवून सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

डंपरला नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणेकडून घटनेची चौकशी केली जात आहे.

Exit mobile version