। पुणे । प्रतिनिधी ।
पाटस अष्टविनायक मार्गावरील हॅाटेल जगदंबामध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटात भाजलेल्या दहा कर्मचाऱ्यांपैकी सहा कर्मचारी गंभीररित्या भाजले आहेत.
दौंड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरील मांढरे मळा येथील हॅाटेल जगदंबा येथे दुपारी हा स्फोट झाला. भटारखान्यातील एका घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याने तेथे काम करणारे दहा कामगार भाजले आहेत. त्यापैकी सहा जण गंभीररित्या भाजले आहेत. स्फोटामुळे हॅाटेलचे पत्रे उडाले तर दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली पडल्या. स्फोटात भाजलेल्या हॅाटेल कर्मचाऱ्यांना मांढरे मळा येथील स्थानिकांच्या मदतीने दौंड शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीररित्या भाजलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. दौंड नगरपालिका व कुरकुंभ एमआयडीसी अग्निशामक विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले. दौंड पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी आहे. आगीत भाजलेल्या 10 जणांपैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. अग्निशामक विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.







