अलिबाग येथे भरला शेतकर्‍यांचा मेळावा

शास्त्रज्ञ डॉ. मोहन बेलगमवार यांनी केले मार्गदर्शन

| वाघ्रण | वार्ताहर |

अलिबाग येथील हिरालक्ष्मी सभागृहात बुधवारी (दि. 2) शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जागतिक कीर्तीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहन बेलगमवार यांनी उपस्थित राहून शेतकर्‍यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या शिबिरात रायगड, रत्नागिरीसह नागपूर येथील शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता.

जागतिक पातळीवर 41 देशांचा संशोधनाचा अभ्यास, सात वर्ष कीटक शास्त्राचा अभ्यास असणारे डॉ. मोहन बेलगमवार यांनी कृषी क्षेत्रात विविध औषधांचा शोध लावून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना, भातशेती, बागायती मळे व अन्य सुपारी, नारळ, आंबा, काजू, केळी आदी पिकांबाबत सविस्तर संवाद साधला. शेती व्यवसायात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यायचे, त्यासाठी कोणती खते वापरायची, कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास कोणती औषधे किती प्रमाणात फवारावी याबाबत सखोल माहिती दिली.

दरम्यान, या मेळाव्यास रायगड जिल्ह्यातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी शेती करताना येणार्‍या अडचणी बोलून दाखविल्या. त्यास मान्यवरांनी साध्या सोप्या भाषेत उत्तरे दिली. शेवटी सर्वांना माहिती पुस्तकेदेखील देण्यात आली. मेळावा यशस्वी करण्यासाठी तात्यासाहेब इंगळे आणि सुशांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version