गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मृतीपत्र कुटुंबियांना प्रदान

| सांगोला | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या राजकारणातील   शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गासाठी संपूर्ण आयुष्यभर भाई डॉ.गणपतराव देशमुख यांनी लढा उभारला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भारतीय राजकारणात वेगळा आदर्श निर्माण केला. एकच मतदारसंघ, एकच पक्ष आणि तब्बल अकरा वेळा विधानसभा विजयी होऊन आगळावेगळा इतिहास निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्याची व विधानसभेतील उत्तुंग कार्याची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भाईचे कार्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहील, यासाठी देशमुख कुटुंबियांना गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा उल्लेख करून स्मृतीपत्र दिले आहे.
शनिवारी (16 जुलै) सांगोल्याचे आ.शहाजी (बापू) पाटील यांच्या हस्ते सदरचे स्मृतिपत्र भाई गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई गणपतराव देशमुख व चि.चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह देशमुख कुटुंब उपस्थित होते.

डॉ. गणपतराव देशमुख यांनी 13 वेळा विधानसभा निवडणूक लढवत 11 वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभा सारखे होते. शेतकरी कामगार पक्षच्या लढवय्या सेनानायकाचा स्मृतिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Exit mobile version