। कोलंबो । वृत्तसंस्था ।
श्रीलंका क्रिकेट संघाने मोठा उलटफेर केला आहे. बलाढ्य न्यूझीलंड संघाला कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात रविवारी (दि.29) एक डाव आणि 154 धावांनी पराभूत केले आहे. यासह श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. श्रीलंकेच्या या विजयात गोलंदाज प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस यांनी मोलाचे योगदान दिले. दोघांनी या सामन्यात प्रत्येकी 9 बळी घेतले आहेत.
दुसर्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर श्रीलंकेने हा निर्णय योग्य ठरवत अफलातून फलंदाजी केली होती. श्रीलंकेने पहिला डाव 163.4 षटकांत 5 बाद 602 धावांचा डोंगर उभारल्यानंतर घोषित केला होता. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला श्रीलंकन गोलंदाजांनी चांगलाच संघर्ष करायला लावला. प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस यांच्यासमोर न्यूझीलंड फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. न्यूझीलंडचा पहिला डाव 39.5 षटकात अवघ्या 88 धावांवर संपुष्टात आला. यामुळे श्रीलंकेला तब्बल 514 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा मिचेल सँटेनरने सर्वाधिक 29 धावांची खेळी केली. तसेच रचिन रविंद्रने 10 धावा आणि डॅरिल मिचेलने 13 धावा केल्या. याशिवाय कोणालाही 10 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक 6 बळी घेतले, तर पेरिसने 3 बळी घेतले. तसेच, असिथा फर्नांडोने बळी घेतला.
श्रीलंकने मोठी आघाडी मिळवल्याने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्यात आले. यामुळे न्यूझीलंडला लगेचच फलंदाजीला उतरावे लागले. न्यूझीलंडने पहिल्या डावाच्या तुलनेत दुसर्या डावात चांगली फलंदाजी केली. दुसर्या डावात ग्लेन फिलिप्सने 99 चेंडूत सर्वोच्च 78 धावांची खेळी केली. तसेच, मिचेल सँटेनरने अखेरीस 115 चेंडूत 67 धावा करत चांगली झुंज दिली. याशिवाय डेवॉन कॉनवेने 62 चेंडूत 61 धावांची खेळी केली, तर टॉम बंडेलनेही अर्धशतक करताना 64 चेंडूत 60 धावा केल्या. केन विलियम्सनेही 46 धावांचे योगदान दिले. मात्र, तरी त्यांचा दुसरा डाव 81.4 षटकात 360 धावांवर संपला. यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसर्या डावात निशान पेरिसने सर्वाधिक 9 बळी घेतले. तर, प्रभात जयसूर्याने 2 आणि कर्णधार धनंजय डी सिल्वाने 1 बळी घेतला.