। नेरळ। प्रतिनिधी।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शेलू गावाच्या हद्दीतील वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी अज्ञान असल्याचे माहिती असताना देखील मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत शेलू येथे असलेल्या मौजे वृंदावन सोसायटी मधील फेज दोन मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तेथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ इमारतीच्या खाली खेळत होते. त्यावेळी सायकलची नवीन घंटी बसवण्यासाठी ती घरी जात होती. त्यावेळी इमारतीच्या जिन्यामध्ये एका व्यक्तीने अडवले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर पुन्हा त्या लहान मुलीला घरात नेऊन गैरवर्तन केले. त्यानंतर त्या लहान मुलीने याबाबत घरी जाऊन माहिती दिल्यानंतर पालक नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पो.स.ई. प्राची पांगे ह्या करीत आहेत. या प्रकारामुळे शेलू सारख्या गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शेलू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
