| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचे आणि रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडिसगाव येथील आदिवासी शाळकरी मुली जिल्हा परिषद शाळेत जात असताना रस्ता अडवून त्या अल्पवयीन मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न आणि नंतर छेडछाड तसेच अश्लील हावभाव केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. चार मुलींबद्दल असा प्रकार गेली दोन महिने सुरू होता आणि त्यामुळे त्यापैकी एका मुलीच्या आईने नेरळ पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार केली आहे.
साधारण 11 वर्षे वय असलेल्या चार मुली शाळेत एकत्र जात असतात. त्यापैकी एका मुलीच्या रस्त्यावर त्या वाडीमधील 27 वर्षीय तरुण उभा असायचा आणि तो त्या अल्पवयीन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. नंतर त्या तरुणाने त्या मुलीच्या अन्य दोन मैत्रिणींचादेखील रस्ता अडवून छेडछाड करू लागला होता. हा प्रकार गेली दोन महिने सुरू असताना त्यातील चौथी मुलगी आई सोबत तेथील ओहोळ येथे कपडे धुण्यासाठी गेलेली असताना वाळकू मालू वाघ हा तरुण तेथे जायचा आणि स्वतःच्या अंगावरील कपडे काढून त्या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा.
हा प्रकार त्या मुलींनी आपल्या घरी आई वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यातील एका मुलीच्या आईने नेरळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यावेळी नेरळ पोलिसांनी त्या चारही अल्पवयीन मुलीची चौकशी केली आणि शेवटी वाळकू मालू वाघ या तरुणाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक अधिक तपास करीत आहेत.