आम्ही गिरगावकर टीम’ची सामाजिक बांधिलकी
| म्हसळा | वार्ताहर |
दररोज आठ किलोमीटरचा प्रवास करून शैक्षणिक भविष्य डोळ्यासमोर ठेवून आयुष्याच्या शिक्षणाचे धडे गिरविणार्या गरजू विद्यार्थिनीला सामाजिक जाणीव लक्षात घेऊन तिचा रोजचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने सायकल भेट देण्यात आली. ‘आम्ही गिरगावकर टीम’ने सामाजिक बांधिलकी जपून ही भेट दिली.
म्हसळा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या सांगवड गावची सुकन्या व न्यु इंग्लिश स्कुल नेवरूळ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेली गरजू विद्यार्थिनी रिया सुभाष गोरीवले हिला ‘आम्ही गिरगावकर टीम’ व ‘श्री उत्कर्ष सेवा संस्था’ यांच्यामार्फत आम्ही गिरगावकर टीमचे सदस्य तथा श्री उत्कर्ष सेवा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड आणि पत्रकार श्रीकांत बिरवाडकर यांच्या हस्ते मोफत सायकल भेट देण्यात आली आहे.
इयत्ता नववीमध्ये शिकत असलेली ही विद्यार्थिनी दररोज सांगवड गाव ते न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळपर्यंत आठ किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेत आहे. शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन सायकल भेट दिल्यामुळे विद्यार्थिनी रिया हिने आम्ही गिरगावकर टीम व सर्व सभासदांचे आभार मानले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, सचिव नितीन रिकामे, मुख्याध्यापक श्री. मिनेकर, शिक्षक श्री. कापसे, श्री. कार्लेकर, ग्रामस्थ शंकर सावंत, सुभाष गोरीवले, श्री. मोरे, श्रीमती गोरीवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.