| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यालगत साईडपट्टीचा अभाव तसेच तलावात वाढलेली जलपर्णी आणि तलावाच्या काठावर वाढलेले गवत व झुडपांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत रस्ता दुरुस्ती, साईडपट्टीचे काम आणि तलाव परिसराची स्वच्छता करून नागरिकांची मागणी पूर्ण केली.
मोहोपाडा तलावावर दरवर्षी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तसेच अनंत चतुर्दशीला मोठ्या संख्येने गणरायांचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला साईडपट्टी नसल्याने आणि तलावाजवळील रस्ता खराब झाल्याने गणेश विसर्जनावेळी भाविकांना अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य रसिका खराडे, प्रतिक्षा राऊत व आकाश जुईकर यांनी पुढाकार घेत तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व साईडपट्टीचे काम करून घेतले. तसेच, गणपती घाट व तलावाच्या काठावरील परिसरातील वाढलेले गवत आणि झुडपे हटवून स्वच्छता करण्यात आली. तलावातील वाढलेली जलपर्णी हटविण्याचे कामही करण्यात आले.






