| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई परिवहन सेवेचा बसथांबा उभारण्यात आला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून वापरात असलेला हा बसथांबा सध्या जीर्णावस्थेत पोहोचला आहे. त्यामुळे भरपावसात बसथांब्याच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना पावसातच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
बसथांब्यावरील सिमेंटचे पत्रे खराब झाले असून, काही ठिकाणी ते मागील बाजूने तुटू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पावसापासून संरक्षण मिळण्याऐवजी बसथांब्यातच पाण्याचा सामना करावा लागत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वे प्रवासानंतर पुढील प्रवासासाठी नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात पनवेल रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाळ्यात गळक्या छतामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची विशेष गैरसोय होत आहे. त्यामुळे छतावरील खराब झालेले पत्रे तातडीने बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, बसथांब्याची संपूर्ण पाहणी करून आवश्यक डागडुजी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून हा बसथांबा वापरात असून, त्याच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि बससेवा यांचा दररोज हजारो प्रवाशांकडून वापर केला जात असल्याने या ठिकाणच्या सुविधांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता बसथांब्याची आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.






