स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा; रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील वक्त्यांचा सहभाग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्व. मीनाक्षीताई पाटील या एक अभ्यासू लोकप्रतिनिधी होत्या. चांगल्या वक्त्या होत्या. त्यांच्या स्मृतीनिमित्त अलिबागमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. एक चांगला उपक्रम असून, बांधिलकीचे वक्ते घडविण्याचे ऐतिहासिक काम केले जात आहे. नव्या वक्त्यांना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून देण्याचे काम केले आहे. अलिबागसह रायगड जिल्ह्यातून उत्तम वक्ते निर्माण झाले पाहिजे. या उपक्रमाचा विस्तार अधिक वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे, असे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना, सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा अलिबागमधील शेतकरी भवन येथे शनिवारी (दि.3) आयोजित करण्यात आली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, तालुका माजी चिटणीस अनिल शांताराम पाटील, शेतकरी संघटनेचे अनिल पाटील, नागेश कुलकर्णी, अलिबाग पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, मोहन धुमाळ, विक्रांत वार्डे, निलेश खोत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील असंख्य स्पर्धक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील व महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या पुढाकारातून वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील, माजी विरोधी पक्षनेते स्व. ॲड. दत्ता पाटील यांचे वक्तृत्वावर एक वेगळे प्रभुत्व होते. त्याच विचारांचा वारसा माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने जपला. मीनाक्षीताई पाटील एक चांगल्या वैचारिक वक्त्या होत्या. आपल्या वक्तृत्वाने वेगळ्या पद्धतीने बोलण्याची एक वेगळी हातोटी त्यांच्याकडे होती. तळागाळातील प्रश्न अभ्यासू वृत्तीने सातत्याने मांडण्याचे काम स्व. मीनाक्षीताई पाटील यांनी केले आहे. आपल्या वक्तृत्वाची एक वेगळी छाप त्यांची राहिली आहे. वक्तृत्व स्पर्धेतून अनेकांना घडण्याची संधी मिळते, असे सांगत जयंत पाटील यांनी त्यांच्या शालेय जीवनातील भाषणाच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत यांनीदेखील आपले मत व्यक्त केले.
स्व. मीनाक्षीताई पाटील स्मृती रायगड जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ‘आजचा विद्यार्थी आणि उद्याचा भारत’, ‘रायगडचा विकास आणि जनतेची अपेक्षा’, ‘सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयात घर करणारी ताई- मीनाक्षीताई’, ‘कलम जब जागती है तब सत्ता कांपती है’, ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’, ‘जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू लावतीय मी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या शैलीतून वक्तृत्व करून श्रोत्यांची मने जिंकली.
परीक्षक म्हणून राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य भगवान लोखंडे, साहित्यिक लेखक अनंत कोळगांवकर, एमए विषयातील सुवर्णपदकाचे मानकरी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या सुरभी वाणी यांनी काम पाहिले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्याला 15 हजार एक रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 11 हजार एक रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला सात हजार एक रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला पाच हजार एक आणि चषक, पाचव्या क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पाच उत्तेजनार्थ म्हणून पाच बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार एक व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
मीनाक्षीताई पाटील यांना हीच खरी श्रद्धांजली : चित्रलेखा पाटील
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या स्व. मीनाक्षीताई पाटील यांच्या नावाने अलिबागमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतली आहे. ही खरी मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली आहे. आपल्या वक्तृत्वाने अनेकांना मंत्रमुग्ध करण्याचे काम मीनाक्षीताई पाटील यांनी केले आहे. ताईंच्या नावाने सुरू केलेली ही स्पर्धा आगामी काळात भव्यदिव्य करण्याचा मानस आहे. शंभरहून अधिक स्पर्धकांना यातून संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दोन दिवस ही स्पर्धा झाली पाहिजे अशा पद्धतीने नियोजन राहणार आहे, असे मत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.







