शिक्षणाची ज्ञानगंगा वाडीपर्यंत पोहोचविणारा ध्येयवेडा

विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना शिक्षित करण्याचा निर्धार

| चिरनेर | वार्ताहर |

आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही लिहिता-वाचता यावे यासाठी ‘शिक्षणाची ज्ञानगंगा आदिवासीवाडीपर्यंत’ असा उपक्रम राबविण्यासाठी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने स्वतः पुढाकार घेतला आहे. महादेव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव आहे. प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशी ते विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्रमशाळेत बोलावून शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यामुळे पालक अंगठ्याच्या जागी आता स्वाक्षरी करु लागले आहेत.

उरण तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून चिरनेर गावात आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्या पालकांमध्ये साक्षरतेचा अभाव असल्याची बाब शिक्षक महादेव डोईफोडे यांच्या लक्षात आली. शिक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना साक्षर करण्याचा निर्धार केला आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ते शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्रमशाळेत बोलावून त्यांना हाताला धरून शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी प्रोत्साहित करू लागले आहेत. हा उपक्रम मागील काही महिन्यांपासून सुरू असून, परिसरातील अनेक आदिवासींना त्यांना कामापुरते का होईना, लिहिता-वाचता येऊ लागले आहे. अंगठ्याच्या जागी ते आत्ता स्वाक्षरी करू लागले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता हे विद्यादानाचे काम उपशिक्षक महादेव डोईफोडे हे निष्ठेने करीत आहेत.

महादेव डोईफोडे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाची दखल घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा रायगड यांच्या वतीने पेण येथील कार्यालयात प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सतीश शेरमकर, चिरनेर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे आदी जण उपस्थित होते.

Exit mobile version