माथेरान मधील आदिवासींचा गैरसोयींशी सामना सुरूच
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान पर्यटनस्थळाच्या पायथ्याशी असलेल्या बहुतेक आदिवासी वाड्यांमधील आदिवासींचे जीवनमान हे केवळ माथेरान या पर्यटनस्थळावर अवलंबून असते. येथील काही वाड्या या खालापूर हद्दीत येत आहेत. परंतु रोजगाराच्या शोधात पूर्वीपासून ही मंडळी माथेरानमध्ये येऊन कुटुंबाच्या उपजीविकेसाठी डोंगर-दर्यांतून अवघड आव्हानांना सामोरे जात आहे. निमुळत्या पायवाटेने जीवघेणा प्रवास करीत कुणी मोलमजुरीसाठी तर कुणी भाजीपाला, गवत, आंबे, रानमेवा विक्रीसाठी आव्हानांचा डोंगर सर करतात.
माथेरान एक सुप्रसिद्ध थंड हवेचे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ असून या पर्यटनस्थळाच्या डोंगरातील दर्या-खोर्यांनमध्ये अनेक आदिवासी लोकांची वस्ती आहे. ही आदिवासी मंडळी उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूत माथेरानमधील डोंगर रांगांतून अवघड निमुळत्या पायवाटेने प्रवास करीत माथेरान गाठतात. कधी उंचच उंच कडे तर कधी दरड कोसळण्याची भीती असतानाही बाराही महिने असा खडतर प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. या आदिवासींमध्ये बहुतांश लोक हे पनवेल तालुक्यातील धोदाणी गावातून सनसेट पॉईंटमार्गे येतात. जवळपास दोन ते अडीच किलोमीटरचा हा प्रवास अन् तेसुद्धा डोक्यावर गवत अथवा भाजीपाला घेऊन डोंगर चढणे म्हणजे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते.
माथेरान मध्ये घोडा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने पावसाळा सुरू होण्याअगोदर गवताची मागणी जास्त असते. त्यामुळे हे आदिवासी लोक भरपूर प्रमाणात गवत विक्रीसाठी घेऊन येतात.धोदाणी येथील आदिवासी लोकांना तर पनवेल बाजारपेठसुद्धा हाकेच्या अंतरावर आहे. पनवेल-धौदाणी मार्गे माथेरान हा रस्ता उपलब्ध झाल्यास या आदिवासींना खूपच सोयीस्कर होणार असून, यामुळेच भविष्यात माथेरान मधील पर्यटन व्यवसायसुद्धा वृद्धिंगत होण्याची शक्यता आहे. सनसेट पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत उत्तम प्रकारे पायवाट उपलब्ध आहे.यामुळेच हा मार्ग बनविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
भविष्यात शासनाने माथेरान पर्यटनस्थळासाठी विचार केल्यास फिनिक्युलर रेल्वे सेवा सुरू होऊ शकते. मोटार वाहनेसुद्धा येथून येऊ शकतात. त्यामुळे आदिवासींच्या रोजगारासोबतच इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ई-रिक्षा प्रमाणे हा प्रश्न देखील मार्गी लागला तर आपले माथेरान पर्यटनस्थळ एका वेगळ्या उंचीवर जाईल.
सुनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते