इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय

| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |

वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळख असलेल्या एलिफंटा बेटावर मागील चार महिन्यांपासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरू आहे. या उत्खननादरम्यान सुमारे 1500 वर्षांपूर्वीचे मानले जाणारे दगड व विटांनी बांधलेले जलाशय तसेच विविध पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत.

या जलाशयांची रचना पाहता त्या काळातील जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी कौशल्य किती प्रगत होते, याचा प्रत्यय येतो. या शोधामुळे एलिफंटा बेटाच्या इतिहासातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना नवे उत्तर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी सांगितले की, या उत्खननातून सापडलेल्या वस्तू अत्यंत दुर्मिळ असून, पुढील संशोधनानंतर बेटाच्या इतिहासावर अधिक स्पष्ट प्रकाश पडेल.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची एक टीम, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली एलिफंटा बेटावर मागील 4 महिन्यांपासून बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या मोराबंदर परिसरात काम करत आहेत. या कामाचा उद्देश या परिसराचा कालानुक्रम निश्चित करणे. तसेच येथील प्राचीन मानवी वसाहतींचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेणे हा आहे. या उत्खननात शोध पथकाला एक आयताकृती जलाशय (टाके) आढळून आले आहे. या जलाशयाला उत्तरेकडे पायऱ्यांचा एक लंबवत भाग जोडलेला आहे. या रचनेमुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडतो. तज्ज्ञांच्या मते, ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण शोधाची नोंद आहे. कारण बेटावर प्रसिद्ध असलेल्या इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जलाशय खडकात कोरून तयार केलेले नाही; उलट, बेटावरील रहिवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि पावसाळ्यातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता यावे, या उद्देशाने याची विशेष अभियांत्रिकी रचना करण्यात आली आहे.
या स्थळावरील महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक म्हणजे एक भव्य वास्तू. त्याची लांबी सुमारे 14.7 मीटर असून, रुंदी 6.7 मीटर आणि 10.8 मीटर इतकी आहे; त्यामुळे या वास्तूला ‌‘टी’ आकाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्खननाचे काम आतापर्यंत 5 मीटर खोलीपर्यंत पोहोचले असून, त्यात 20 पायऱ्या उजेडात आल्या आहेत. या पायऱ्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत; विशेष म्हणजे, हे दगड एलिफंटा बेटावरील स्थानिक दगड नाहीत, असे पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी सांगतात.

हा शोध महत्त्वाचा का आहे?
एलिफंटा बेट हे प्रामुख्याने खडकात कोरलेल्या अद्भुत वास्तूंसाठी ओळखले जाते. यापूर्वीही येथे पाण्याचा साठा करण्यासाठी वापरली जाणारी अशीच काही टाकी आढळून आली होती. परंतु, येथे पाण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली वास्तू रचना पाहायला मिळते. बेटावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडत असले तरी येथील जमिनीचा पृष्ठभाग खडकाळ असल्यामुळे पाण्याचा जमिनीत झिरपण्याचा वेग अत्यंत कमी असतो; परिणामी, बहुतांश पाणी वाहून जाऊन थेट समुद्रात मिळते. पावसाळा संपल्यानंतर ज्या बेटावर पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अशा प्रकारच्या जलसाठवणूक वास्तूंची नितांत गरज भासते, असे आंबेकर नमुद करतात.
कुंडं की पायऱ्यांची विहिर?
तज्ज्ञांच्या मते, या वास्तूला केवळ कुंड म्हणून वर्गीकृत करता येणार नाही; कारण हे जलाशय कोणत्याही मंदिराला जोडून बांधलेले नाही. ते या वास्तूची तुलना पायऱ्यांच्या विहिरींशी करतात. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या अशा विहिरींशी, जिथे पायऱ्या उतरून गेल्यावर मध्यभागी असलेल्या मुख्य जलाशयापर्यंत पोहोचता येते. अशा प्रकारच्या वास्तू रचनेचा उगम साधारणपणे इसवी सनाच्या 7 व्या शतकात झाला असावा, असे मानले जाते. या शोधामुळे या संकल्पनेचा स्थानिक प्रकार आणि या प्रदेशात तिचा विकास कसा झाला, याविषयीच्या आकलनात भर पडू शकेल, असे आंबेकर यांनी नमूद केले.
Exit mobile version