मार्गावर निवारा शेड, स्वच्छतागृह व बैठकीची व्यवस्था
| चिरनेर | प्रतिनिधी |
जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावरील पर्यटकांची वाढती वर्दळीचा ताण कमी करण्यासाठी शेतबंदर येथील जुन्या जेट्टीला जोडून 88 रुपये खर्चून 10 मीटर रुंदीची अद्ययावत नवीन जेट्टी उभारण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर त्वरित या कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.
एलिफंटा जागतिक कीर्तीच्या बेटावरील काळ्या पाषाणात कोरलेल्या अद्भुत लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश आहे. शिवाची विविध रुपे असलेल्या या अद्वितीय जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी वर्षभरात जगभरातून सुमारे 20 लाखांहून अधिक पर्यटक हजेरी लावतात. यामध्ये दरवर्षी वाढ होत असली तरी पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना घेऊन लॉन्चेस बेटावरील शेतबंदर जेट्टीवर येतात. सध्या पर्यटकांना चढ-उतार करण्यासाठी अस्तित्वात चार मीटर रुंदीची जेट्टी आहे. याच मार्गावरुन मिनीट्रेन धावत असल्याने पर्यटकांना चालण्यासाठी जुनी जेट्टी अरुंद असल्याने त्रासदायक ठरत आहे. तसेच या जेट्टीपासून लेण्यांच्या पायऱ्यांपर्यंत असलेल्या सुमारे एक किमी अंतरापर्यंत देशी-विदेशी पर्यटकांसाठी फारशा आवश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत. या गैरसोयींमुळे दररोज बेटावर येणाऱ्या हजारो पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
एलिफंटा बेटावर येणाऱ्या हजारो पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सागरमाला योजनेतून शेतबंदर येथील जुन्या जेट्टीचे मजबुतीकरण व चार मीटर रुंदीची जुन्या जेट्टीला जोडून 88 रुपये खर्चून 10 मीटर रुंदीची अद्ययावत नवीन जेट्टी उभारण्याची योजना आखली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पर्यटकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. याशिवाय या मार्गावरील एक कि.मी. अंतरादरम्यान पर्यटकांसाठी शेड, स्वच्छतागृह नाहीत.ही गैरसोय दूर करण्यासाठी आबालवृद्ध देशी-विदेशी पर्यटकांसाठी उठबस करण्यासाठी शेड, बैठका उभारण्यात येणार आहेत. तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत, असेही सुधीर देवरे यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या नवीन जेट्टीचे काम करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर त्वरित या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
सुधीर देवरे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड