| मुंबई | प्रतिनिधी |
कोलंबोहून न्हावा शेवा येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग लागली आहे. या जहाजातील चार क्रू मेंबर बेपत्ता आहेत. तर 5 क्रू मेंबर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या मालवाहू जगाजावर एकूण 22 क्रू मेंबर्स होते, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहाजाच्या अंडरडेकमध्ये स्फोट झाला आहे. आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये अगोदर आग लागली. त्यानंतर या जहाजाचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. मात्र, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कोची येथे ही दुर्घटना घडली आहे. या आग लागलेल्या मालवाहू जहाजाचे नाव MV WAN HAI 503 असे आहे. या दुर्घटनेनंतर भारतीय नौदलाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कोझिकोडमधील बेपोरच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाला आग लागली. हे जहाज मूळचे सिंगापूरचे आहे. या जहाजाची लांबी 270 मीटर आहे तर रुंदी ही 12.5 मीटर आहे. हे जहाज कोलंबो येथून 7 जून रोजी निघाले होते. 10 जून रोजी हे जहाज एनपीसी मुंबई येथे येणार होते, असे भारतीय नौदलाने सांगितले आहे. पण मुंबईत येण्याआधीच या जहाजातील कंटेनर्सना आग लागली.